१.
माझ्यात जिव्हाळा सोडुन बाकी काहीही नसते
हृदयात तुझ्या असते जे...माझ्या गावीही नसते
लिहितो कोणासाठी मी ठाऊक मलाही नाही?
लिहिलेले सारे केवळ माझ्यासाठीही नसते
ताईत बनवते केंव्हा खाईत लोटुनी देते
जिंदगी वाटते तितकी साधीसोपीही नसते
निर्भीड कधी कोणाला विक्षिप्त वाटतो कारण
बोलणे-वागणे माझे माझ्या हातीही नसते
दारात कुणाच्या कायम लक्ष्मी पाणी भरते तर
ताटात कुणाच्या साधी भाकरभाजीही नसते
सुख-समृद्धी असताना जमतात शेकडोजण पण
दुःखात एकटे आपण...सोबत कोणीही नसते
जेवढी अराजकता या देशात माजली आहे
तेवढी भयानक कुठली आणीबाणीही नसते
एकेक हट्ट बहिणीचा थाटात पुरवतो कोणी
बहिणीसाठी कोणाच्या साडीचोळीही नसते
मस्तवाल सत्तांधांना दाखवून देते जागा
जेवढी वाटते जनता तितकी साधीही नसते
२.
शहाण्यासारखे केंव्हा...कधी माथेफिरू होते
कळप दिसताच माझ्याही मनाचे वासरू होते
अशी माझ्यामधे आधी कधी नव्हतीच कट्टरता
कधी माझ्यातही साधे निरागस लेकरू होते
तुला नंतर सवय होइल उन्हाची काहिलीचीही
कुठे आयुष्यभर वाटेमधे माझ्या तरू होते?
तिचा होकार आल्याने हृदय आनंदले कारण
तिच्या हृदयात हंगामी किती भाडेकरू होते
कुणी घेऊ नये शंका कुणाच्या देशभक्तीवर
तुझे आदर्श सावरकर...कुणाचे नेहरू होते
तसे तर फारसे नाही पटत माझे फुलांशी पण
तुला स्मरताच माझे नेहमी फुलपाखरू होते
जगाच्या शर्यतीमध्ये सतत धावून थकल्यावर
गझल कुरवाळते जेंव्हा...जिवाचे कोकरू होते
३.
सुंदर स्वतःचे नेहमी सांभाळ डोळे
करतात दुनियेला तुझे घायाळ डोळे
असतील निश्चल शांतही आधी किती पण
माझ्यामुळे झाले तुझे वाचाळ डोळे
आयुष्यभर केवळ तुला जपले तयांनी
केंव्हातरी माझे तुही कुरवाळ डोळे
असतो कसा त्यांच्यात ओलावा सदोदित?
पाहत कधी नाहीत का दुष्काळ डोळे?
विसरून जातो वर्तमानाला स्वतःच्या
स्मरतो कुणाचे पाहुनी भुतकाळ डोळे
संसर्ग दुनियेचा मला झाला असावा
झालेत बघ माझे किती शिवराळ डोळे
सांगत सतत असतात गोष्टी निरनिराळ्या
विक्रम कधी...केंव्हा तुझे वेताळ डोळे
असतील मनमोहक कुणाचेही किती पण
दुष्प्राप्य आईसारखे लडिवाळ डोळे
शिकवण मला देतात समता बंधुतेची
दसरा कधी...केंव्हा तुझे नाताळ डोळे
निर्व्याज माझ्यावर किती करतात माया
मज वाटती कायम तुझे आभाळ डोळे
परिणाम भेटीचा तुझ्या नक्की असावा
नव्हते कधी माझे असे ओढाळ डोळे
.................................
चंद्रकांत कदम (सन्मित्र)
नांदेड
9921788961
Superb 👌👌💐💐♥️♥️
ReplyDelete