१.
काळ हा आला गतीने धावण्याचा
का उगा करतो बहाणा त्रासल्याचा?
पावलांवर ठेव तू विश्वास वेड्या,
घावही विसरू नको ठेचाळल्याचा
रोज शर्यत जीवघेणी भोवताली,
क्षण कुठे मिळतो जराही थांबण्याचा?
येत असतो सूर्यही क्षितिजावरी या,
थांबतो मग खेळ येथे सावल्यांचा.
या जगाचा डाव कायम ठेव ध्यानी,
स्वार्थ साधून माणसाला टाळण्याचा.
लाख क्षण मोहात पडण्याचे जरीही,
काळ गेला मृगजळावर भाळण्याचा
काळ सोनेरी तुझ्या हातात जर हा,
फायदा मग काय अश्रू ढाळण्याचा?
२.
हृदयातल्या व्यथेला गाडावयास आले,
जगणे पुन्हा नव्याने थाटावयास आले
व्यापात या जगाच्या व्यापून घेतलेले
जमणार का कुणाशी बोलावयास आले
का मानवी मनाची संवेदना हरवली?
हृदये दुरावलेली जोडावयास आले
क्षितिजापलीकडे तो सूर्य रोज बुडतो
तैयार त्यापरी मी उगवावयास आले
नाही पसंत मजला ते बोलणे विखारी
दबक्या स्मितास कायम हसवावयास आले
३.
कोण कोणाच्या इथे कामास येतो?
साधण्याला फक्त तो स्वार्थास येतो
चेहऱ्यावर हास्य क्षणभरही नसावे?
केवढा हा दंभ त्या नात्यास येतो.
नांदते सुख झोपडीच्या उंबऱ्याशी,
अत्तराचा गंध मग घामास येतो
गुंफली जाती फुले एका ठिकाणी
केवढा हा अर्थ त्या धाग्यास येतो
वासरे दाव्यास झाली पारखी जर,
ऐनवेळी भाव मग चाऱ्यास येतो?
मेघ जेव्हा आठवांचे दाटलेले ,
पूर मग डोळ्यातल्या पाण्यास येतो?
.................................
छाया बैसाणे(सोनवणे)
जळगाव
9284635108
No comments:
Post a Comment