तीन गझला : सौ.वासंती वैद्य

 



१.


लावताना होत असते सानमोठी वात थोडी

जेवढा तो स्नेह द्यावा 

रात ये दारात थोडी


आपुला फोटो  असे तो कोण त्यासी हार घाली? 

येत जाती दोस्त भाई बोल ना तू बात थोडी


वादळांना साथ दिली फुंकरीच्या आठवांनी

झेलताना दुःख आली सावली पदरात थोडी


काळरात्री झेलताना या सुखांनो या म्हणालो

पौर्णिमेच्या चांदण्याने ओसरावी रात थोडी


आसवांनी वाहताना ठेवले ना भान थोडे

ओघळावे गूज सारे पण उरावी मात थोडी


२.


ती आग लागलेली गेली विझून आता 

का ऊब मागतो तू राखेकडून आता


पायांवरी कुणाच्या मी शीर सांग ठेवू 

जातील पाय देवा तुझे झिजून आता 


वस्तीत माणसांच्या मी एकलाच फिरुनी 

माणूसकीस बघतो गोळा करून आता


इस्टेट वारसांना द्यावी जरा  म्हणालो 

नाती किती जणांशी आली जुळून आता


रांगेत नास्तिकांच्या केले उभे मला तू 

का रांग दर्शनाची  सूनी पडून आता


३.


पंखातल्या बळाचा झाला प्रभाव नाही

आकाश पेलण्याचा ज्यांना सराव नाही


काठावरी बसोनी लाटाच मोजतो मी

त्याच्यापुढे अताशा माझीच धाव नाही


का शोधते पसारा मी त्याच आठवांचा

स्वप्नात गुंग होणे माझा स्वभाव नाही


अस्तास सूर्य जाता हातात दीप घेतो

हे जाणतो उजेडी त्याचा निभाव नाही


माखून टाकतो या शिल्पास शेंदुराने

रंगाविना तुलाही मिळणार भाव नाही


................................

सौ.वासंती वैद्य, 

पुणे.

1 comment:

  1. व्वा. छान आहेत तीनही गझला. अभिनंदन.

    ReplyDelete