तीन गझला : निलेश कवडे

 



१.


आम्ही असा मिटवला,तंटा जुन्या घराचा

सगळे मिळून केला,सौदा जुन्या घराचा


पाडायच्या अगोदर,आजी रडत म्हणाली,

"फोटो तरी मुलांनो, काढा जुन्या घराचा "


आलो नव्या घरी अन् मी कर्जदार झालो

आधी असायचो मी, राजा जुन्या घराचा


बांधेल फ्लॅट येथे, कोणी उद्या नव्याने

येईल का बदलता? रस्ता जुन्या घराचा


डोळ्यांत आसवांसह अवघ्या स्मृती तरळल्या 

सोडून आज आलो,ताबा जुन्या घराचा


अद्याप आत माझ्या, वसतो जुना जमाना

अद्याप घालतो मी, चष्मा जुन्या घराचा


शहरात आज आहे मोठे मकान माझे

आहेच यात मोठा, वाटा जुन्या घराचा


कुठल्याच हादऱ्यांनी खचले कधीच नाही

रचलाय पूर्वजांनी पाया जुन्या घराचा


शहरीकरण खुबीने भाडेकरी बनवते

पुरतो कधी कुणाला पैसा जुन्या घराचा


आजा नव्या घराच्या, खिडकीस प्रश्न करतो

मिळणार का? इथेही वारा जुन्या घराचा


२.


लोकशाहीचे खरे वाहक तुम्ही आम्ही

कागदावर राहिलो मालक तुम्ही आम्ही


खाजगीकरणामुळे जाणीव होते ही

वाटतो सरकारला ग्राहक तुम्ही आम्ही


सर्वजण लिहितात येथे कागदावरती

काळजावरचे बनू लेखक तुम्ही आम्ही


या व्यवस्थेशी झगडणे संपले नाही 

या व्यवस्थेतील आंदोलक तुम्ही आम्ही


वाजवू टाळ्या, पुढेही वाजवत राहू 

शेवटी आहोत ना प्रेक्षक तुम्ही आम्ही


वाद करणारे हळू होतात बाजूला

राहतो फोडायला मस्तक तुम्ही आम्ही


स्वप्न अन् वास्तव समांतर एकमेकांना

त्यांत फिरणारे जणू दोलक तुम्ही आम्ही


३.


कुठे केवळ स्मृतींना पालवी फुटली

मनाच्या आरश्याची काचही फुटली


सजा मिळणार म्हाताऱ्यास महिनाभर

चुकीने औषधीची बाटली फुटली


पुन्हा झेपावला ना दाब तृष्णेचा

पुन्हा वस्तीतली जलवाहिनी फुटली


जरा नजरानजर अन् लागला 'चटका'

तिच्या हातातली मग कपबशी फुटली


असा काही पदांचा थाट आताशा

नवी शिंगे जशी डोक्यावरी फुटली


अचानक रंग संसारातला उडला 

जशी दारात मदिरेची शिशी फुटली


निशाणी लोकशाहीची अशी दिसली

मते यंदा अमुक जातीतली फुटली


पुन्हा केवळ तिचे पाणावले डोळे

पुन्हा प्रणयात केवळ बांगडी फुटली


लढाई जिंकलो असतोच पण हरलो

जवळची ऐनवेळी मंडळी फुटली


घरी जर सर्व काही चांगले आहे

कशी शाई तुझ्या पत्रातली फुटली


No comments:

Post a Comment