तीन गझला : हेमंत रत्नपारखी

 


१.


दैव आहे नाटकी ते आस मोठी लावते

भेटण्या जाता सुखाला सौख्य कोठे भेटते ?


एकदा संपेल आता लोकशाही चांगली

चालतो बाजार येथे रोज जनता पाहते


ज्ञान अज्ञानास मागू लागले दे चाकरी

स्वाभिमानी दुःख त्याचे मानहानी पोसते


आपल्या शक्तीस आता ओळखावे सागरा

फार मोठी लाट येते पण किनारी थांबते


नोकरी आहे मुलाला काय कामाची तिच्या

माय त्याची रोज येथे भाकरीला शोधते


२.


दुःख मोहात मी पाहिले

सौख्य त्यागात मी पाहिले


शब्द झाले मुके ज्या क्षणी

प्रेम डोळ्यांत मी पाहिले


रंग आहे कसा वेगळा

धर्म झेंड्यात मी पाहिले


गोड तोंडापुढे बोलले

दोष त्यांच्यात मी पाहिले


सोसल्या वेदना अंतरी

स्वप्न कष्टात मी पाहिले


३.


बोललो जरी मी सखे तुला घेऊ नकोस मनावर

भरतील कान तुझे विश्वास ठेवू नकोस कुणावर


कोण कसे ते ओळखून घे जरी वाटले आपले

असे भावकी आप मतलबी नको भरोसा बुडावर


करून तुलना नको वाढवू न्यूनगंड तो मुलांचा

लक्ष असावे तुझे सारखे वाढवलेल्या गुणावर


कशाला हवी होंडा गाडी अन् सुंदर तो बंगला

संस्काराचा कळस असावा चार खणाच्या घरावर


चिडचिड करतो प्रेमळ भुंगा गंध मिळेना फुलाचा

इच्छा त्याची संपत नाही फिरत राहतो फुलावर 


कोण आपले परके कोणी कळेना कसे नात्यास

लोभापोटी घाव घालती माय पित्याच्या उरावर


भेटत नाही निष्ठा कोठे सत्तेच्या या खेळात

पाळत नाही नेता  आता शब्द एकदा दिल्यावर


No comments:

Post a Comment