दोन गझला : ज्योत्स्ना राजपूत




१.

आयुष्याच्या जात्यामध्ये रोजच चिंता दळू

एवढेच तर केले देवा जसे लागले कळू


कठपुतली मी फिरतच आले फिरवत गेले तसे

अजून सुद्धा कळते कोठे?कुण्या दिशेला वळू


संकट आले,झेलत गेले,वाट शोधली नवी

मनात सुद्धा आले नाही कशी यातून पळू


श्वास घ्यायचे जगण्यापुरते उसंत होती कुठे

मागे मागे फिरतच होता परिस्थितीचा वळू


पिकले आता पान मनाचे लटकत आहे जणू

विचार त्याचा आज गळू की दोन दिसांनी गळू


अनंत होत्या जरी अडचणी वेचत आले फुले

इतके मजला माहित होते कुठे किती दरवळू


२.


एवढे काही तुझ्या माझ्यात नाही 

आजही हातात साधा हात नाही


खानदानी फार आहे दुःख माझे

उंबऱ्याबाहेर केव्हा जात नाही


यायचे तर ये घरी माझ्या सुखा तू

मी तुझा करणार काही घात नाही


रोज जळणे हे जरी भाग्यात माझ्या

मी दिव्याची तेवणारी वात नाही


खायचे बोलायचेही  वेगळाले

हे असे संस्कार माझ्या आत नाही


1 comment:

  1. दोन्ही गझला छानच आहेत. पहिल्या गझलेतील शेवटच्या शेरात 'माहीत' हा शब्द मात्रापूर्तीसाठी 'माहित' असा घेतला आहे. येथे दीर्घ ईकाराऐवजी ऱ्हस्व इकार घेऊन सवलत घेतली आहे.

    ReplyDelete