दोन गझला : वैभव जोशी

 


१.


उजेड सारे अर्ध्यातुन जर वळले नसते

काळोखाला काही काही कळले नसते


जीवच जडला नसता जर का मातीवरती

आभाळाचे पाय जराही मळले नसते


उदयाने जर लाही लाही केली नसती

भर माध्यान्ही माझे 'मी'पण ढळले नसते


त्या वाऱ्याने पाठ फिरवली नसती तर मग

ह्या झाडावर हे पक्षी आढळले नसते


चार क्षणांनी भरते ह्या पोटाची खळगी

नाहीतर काळाला कोणी दळले नसते


कोणी कोणी कोणासाठी कोणी नसता

कोणासाठी कोणीही कळवळले नसते


२.


अचानक फोन येतो अन् अचानक मन तरल होते

तिथे होते तुझी कविता इथे माझी गझल होते


सहज गप्पा सुरू असता तुझा उल्लेख आला की 

जगाशी बोलतानाही उभे जग बेदखल होते


कधी तंद्रीत अश्रूंनी तुझे मी नाव लिहितो अन्

रिकाम्या राहिलेल्या कागदाची चलबिचल होते


कधी कुठल्या चकोराच्या उशाशी चंद्र का नसतो

अशा नाजूक प्रश्नांची सुन्या रात्री उकल होते


तुला मी मोगरा म्हणतो, मला म्हणतेस तू चाफा

बघूया दोन गंधांची कधी अदलाबदल होते


3 comments:

  1. दोन्ही खूप सुंदर गझला आहेत. पहिल्या गझलेतील शेवटच्या शेरात अनुप्रास उत्तम हाताळला आहे! 'अर्ध्यातून' हा शब्द (दीर्घ ऊन ऐवजी) मात्रापूर्तीसाठी 'अर्ध्यातुन' असा (ऱ्हस्व उन) घेतला आहे.

    ReplyDelete
  2. आहाहाहा...रिकामी राहिलेल्या कागदाची चलबिचल होते...
    काय जबरदस्त लिहलं आहे सर.
    तिथे होते तुझी कविता इथे माझी गझल होते...
    आणि शेवट तर आहाहाहा...
    बघूया दोन गंधांची कधी अदलाबदल होते...
    एका पेक्षा एक जबरदस्त शेरांची ही गझल खुपच भावली.

    ReplyDelete