तीन गझला : मीनल बाठे

       




१.

रातभर छुनछुन मनाशी आठवांची साखळी
गोड रुणझुण काळजाशी
रातव्यांची साखळी

दूर गेल्या पावसाला बोलवावे हो कसे
भूमिपुत्राच्याच नेत्री आसवांची साखळी 

केवढी स्वप्ने उराशी रम्य लाघव हासते
गर्द झाडीतून दिसते काजव्यांची साखळी

हे किती निष्ठूर हल्ले कोवळ्या जळती कळ्या
कोठुनी घेरून आली राक्षसांची साखळी ?

ही मराठी अस्मिता हे राज्य शिवबांचे उभे
रक्षिण्या होती सभोती मावळ्यांची साखळी

ही कशी सत्तेपुढे लाचार होती माणसे ?
टपुन बसलेल्या अघाशी कावळ्यांची साखळी 

काय तू 'क्षितिजा ' मिळवले जीवनी या येउनी?
सादता धावून येते माणसांची साखळी 

२.

रोज मी ताज्या दमाने ओढते आयुष्य माझे
सांजरातीला कधी मी चाळते आयुष्य माझे

झेलताना घाव सारे ओठ मिटलेले सदा मी
लिंपुनी साऱ्या फटींना सांधते आयुष्य माझे

मागचे मागेच सारे सोडुनी आले इथे मी
का पुन्हा ते डाव आता मागते आयुष्य माझे?

कोंडलेला श्वास माझा मोकळा व्हावा म्हणोनी
केवढे ओझे उरी सांभाळते आयुष्य माझे

जीवनाचा गोषवारा
मांडताना हा पसारा
सांग का माझ्यासवे हे भांडते आयुष्य माझे?

खेळताना खेळ आता संपताना वेळ आता
घे जगूनीया जरासे सांगते आयुष्य माझे

पापणीवेशीमधूनी गझल झुकते काळजाशी
अन् नव्याने सप्तरंगी रंगते आयुष्य माझे

सोसलेले दुःख 'क्षितिजा ' सोनचाफी फूल झाले
बघ पुन्हा त्याच्यासवे गंधाळते आयुष्य माझे

३.

कोणतेसे दुःखओझे वाहते आहे मनी
बांध त्यावर सांत्वनाचा घालते आहे मनी

शब्द नाही,सूर नाही,ऐकु येते का तरी?
मौन शब्दांवीन काही बोलते आहे मनी

दृष्टिपारच जाहले,होते कधी ध्यानीमनी
आज वळुनी आत थोडे पाहते आहे मनी

गर्द ओल्या पावसाळी सर्दओलीशी हवा
पावसाचे गूज त्या बघ सांगते आहे मनी

ना कधी पायांतली या पैंजणे नादावली
एक लाडिक  घुंगरू बघ बांधते आहे मनी

साद ना ओठावरी येऊ दिली,तिज रोखिले
आज 'क्षितिजा 'च्या तळाशी ठेवते आहे मनी

.................................
मीनल बाठे.
'क्षितिजा '
पुणे.

No comments:

Post a Comment