तीन गझला : विनोद देवरकर

 


१.


केला उठाव तेव्हा,आता निवांत आहे

लाव्हाच अंतरीचा हा आज शांत आहे


मारू नका फुशारी डबक्यात बेडकांनो

प्राशून आसवांना झालो प्रशांत आहे! 


मी भेटतो गळ्याशी मनमोकळे हसूनी

जिवनात वेदनेला कोठे सिमांत आहे?


मानू कुणा कुणाचे आभार आज येथे

हृदयात आज सारे,पण मी अशांत आहे


सांगा कुणी,कुठेही थांबून राहिला का?

जर थांबला कुणी तर तेथे युगांत आहे!


२.


देणे उधार बाकी पण सोडतो न घोडी 

माझी मलाच केव्हा वाटेल लाज थोडी?


मी बोललोच नाही खोटे कधी कुणाला

येणार मग कशी रे या कारल्यात गोडी?


दररोज ही त्सुनामी दुःखास सागराच्या

बुडले जहाज जेथे तरणार काय होडी?


मी गुरफटून गेलो स्वार्थात एवढा की

नाती फरार झाली,संबंध प्राण सोडी 


मीही नसायचो त्या लाचार बैठकीला

नाही कधीच पटली माझी मलाच जोडी


३.


का परीक्षा नवी लादते नेहमी?

भाव बाजारचे पाडते नेहमी!


प्यायचे जर तुला, घाम पी, रक्त पी! 

विष बळीलाच का पाजते नेहमी?


रांगते अंगणी ती उपाशी पिढी

भूक त्यांना खरी जाळते नेहमी


पूजिले मी जिला होय लक्ष्मीच ती

लांडग्यांच्या घरी नाचते नेहमी!


टाळणे ना बरे दोस्त मित्रास रे

जीव ओवाळती यार ते नेहमी


5 comments:

  1. अप्रतिम आहे सर हे कसं सुचतं

    ReplyDelete
    Replies
    1. अगदी सहज! आपले मनापासून धन्यवाद.

      Delete
  2. Replies
    1. मनापासून धन्यवाद सर जी .

      Delete
  3. This comment has been removed by the author.

    ReplyDelete