प्रगल्भ खळखळता प्रवाह म्हणजे 'किनारा' गझलसंग्रह : सतीश कोंडू खरात

 



          मराठी गझल क्षेत्रात सुरेश भट आणि त्यांचे 'एल्गार' व 'झंझावात' हे गझल संग्रह रसिकांसाठी आदर्शच. हे गझल संग्रह वाचून कमालीचे प्रभावित झालेले आणि त्यातील ‘गझलेची बाराखडी‘ गिरवून  नावारूपास आलेले मुर्तीजापूर नगरीतील सर्वोत्तम कवी,  वक्ता तथा भारदस्त व्यक्तिमत्त्व मा. संदीप वाकोडे यांचा 'किनारा' हा गझलसंग्रह प्रकाशित झाला आहे. या आधी ‘लढाई‘ (कवितासंग्रह) व ‘प्रबोधनाची पिंपळपाने‘ (वैचारिक लेखसंग्रह) ही त्यांची दोन पुस्तके प्रकाशित आहेत. ‘किनारा‘ हा त्यांचा पहिलावहिला गझल संग्रह होय.

          मराठी गझलेचा विचार करता गझल हा प्रकार साहित्य क्षेत्रात सर्वांनाच अधिकाधिक आवडणारा काव्यप्रकार होय. मात्र सुरुवातीलाच आशयसंपन्न, तंत्रशुद्ध आकृतिबंधात गझल लिहिणे थोडे कष्टदायकच! विविध वृत्तात सराव करून-करून गझल लिहिणे जमले की मग, या काव्यप्रकाराएवढा दुसरा कुठलाच काव्यप्रकार मनाला भावत नाही.   रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविण्यासाठी गझलकार हा उत्तम कवी असला पाहिजे. तरच तो साध्या आणि सरळ भाषेतही आपला शेर विशिष्ट उंचीवर नेऊन ठेवू शकतो. सामान्य गझलेची असामान्य ताकद संदीप वाकोडे यांच्या गझल संग्रहात पावलोपावली दिसते.

          मनाला पंख, स्वप्नाला धुमारे, आणि क्षणाला सुगंध येण्यासाठी कुठलाच काळवेळ नाही. वसंत बहर असो, शिशिराची पानगळ वा मनातले दुःख दाखविता येत नाही. मात्र या अवस्था कवी मनाला विचारप्रवण नक्कीच करतात. नवे संकल्प शब्दातून भळभळू लागतात. हे भळभळणारे शब्दच मग अजरामर शेराचा प्राण होतात.  आणि गझलेला धगधगती आग प्रदान करतात.

'युगाची दाद घेणारा सुचाया शेर अजरामर
स्वतःला लाव धगधगत्या गझलची आग यंदा तू'

'शेर लिहिण्या मी मला बेभान करतो
गझलसाठी या जिवाचे रान करतो'

किनाऱ्याला लागलेला खडक कितीही स्थितप्रज्ञ दिसत असला तरीही, नियमित वाहणाऱ्या प्रवाहाला झेलत-झेलत तो कणाकणाने सारखा झिजत असतो.हा किनाऱ्यांना शाप आहे. भरती-ओहोटी प्रमाणे दिवसाची गती निरंतर सुरु राहते. या अवस्थेत एका वळणावर दुधाळफेण्या शब्दांचे तुषार किनाऱ्यालगत येतात अन् आपण त्यात एकरूप होऊन जातो.याची अनुभूती गझल संग्रह वाचताना वारंवार येत राहते.

'कैफात वादळाला पर्वा कुठे कशाची
ध्येयास गाठण्याला होऊ तसेच आपण'

'चंद्रमा ओथंबला रक्तात माझ्या
चांदण्याला माळण्याचे ठरवले मी'

'चेहऱ्याने जरी मानवी यारहो
माणसे जाहली पाशवी यारहो'

          संदीप वाकोडे यांच्या ‘किनारा‘ या गझल संग्रहातील सर्व गझलेचे मिसरे मनाला भिडणारे आहेत. शक्यतो गणवृत्तात लिहिलेल्या सर्व गझला अतिशय नादमधुर व निर्दोष आहेत. त्यांची शब्दांच्या बांधणीवर मजबूत पकड आहे. त्यामुळे संग्रहातील गझलेचे मतले व शेर सहज व्यक्त झालेले आणि ऐकणाऱ्याच्या व वाचणाऱ्याच्या काळजात थेट शिरणारे आहेत.

कवीसाठी शब्द हे व्यक्त होण्याचे प्रभावी माध्यम आहे. प्रतिभेच्या जोरावर  साहित्यातून मुक्तपणे व्यक्त होण्याची संभावना वृद्धिंगत होते. संदीप वाकोडे यांच्या गझला सज्जनांचा व्यवहार सांगण्याचा प्रयत्न करतात. हृदयाला भिडणारे शब्द धारदार होतात. शब्द चार दिवसाच्या बोलीवरही उधारीवर आणल्या जात नाहीत. शब्द जगण्याचे मर्म सांगतात तेव्हा आपसूकच शेर धारदार होतात.

'थेट आरपार पाहिजे
शब्द धारदार पाहिजे'

किंवा

'एवढा कुठे बरे भिकार मी
शब्द आणले न हे उधार मी'

हे सत्य मांडल्या जाते. आपण बघतो, राजकीय नेते स्वतःच्या स्वार्थासाठी आपल्यामध्ये समाज घातकी विचार पेरून जातीय आणि धार्मिक दंगली घडवून आणतात. दंगली कुठेही होवोत त्या वणव्यात होरपळला जातो फक्त तो निष्पाप माणूस आणि अबोल घरे. धर्मांधांचा हा अघोरी धंदा राजरोसपणे सुरू आहे तेव्हा कवी म्हणतो-

'चालला तेजीत धंदा धर्मांधांचा
दंगलीने घर जळाले बघता बघता'

सगळीकडे कोलाहल माजतो. अशावेळी त्या विषाक्त पिल्लावळींना भर चौकात टांगून त्यांची थोबडे नामशेष करावीशी वाटतात. सिंहासने पेटवून विद्रोह करावासा वाटतो. सारे उन्मत्त राजवाडे जमीनदोस्त करावेसे वाटतात.

'धर्म जातीत जुंपून देतात जे
लोक चौकात ते टांगण्यासारखे'

हे झाल्यावर मग एकमेकावर प्रेम दाखवून, एकाच घरात सौख्याने, सलोख्याने नांदावेसे वाटते. तेव्हा अवघा संसार सुखाचा होईल. अशी भावना व्यक्त होते.

'माणूस माणसाशी वागेल प्रेमभावे
होईल मग सुखाने संसार माणसाचा'

संदीप वाकोडे यांनी ‘किनारा‘ या गझल संग्रहात विचार आणि कल्पनेची सुयोग्य सांगड घालून मतले व शेर रचलेले आहेत. त्यांनी गझलेत गुळगुळीत शब्दांचा वापर न करता सुयोग्य, चपखल शब्दांना प्राधान्य दिले आहे.

'मानले मी तुला स्मशाना
एक तू रंक राव केला'

'निघण्याआधी विचार कर तू
वाट गझलची खडतर आहे'

किंवा

'वेदनांना अर्थ सुंदर यावया
गझलची बाराखडी गिरवून घे'

संदीप वाकोडे यांची कलंदर वृत्ती जीवनाचा मतितार्थ सांगते. जीवनातील प्रत्यक्ष संघर्ष व अनुभव मांडते.  जन्माने कोणीही लहान वा मोठा,श्रेष्ठ वा कनिष्ठ नाही. मात्र स्वार्थाने बरबटलेल्या समाजात दुर्गुणांची घाण नसलेला 'माणूस दाखवा' हे केलेले आर्जव पारदर्शक वाटते.

'व्यवहार या जगाचा कळला कधीच नाही
संघर्ष या जगाशी टळला कधीच नाही '

‘किनारा‘ या गझल संग्रहात एकूण ८७ गझलांचा समावेश आहे. काळजातली खळखळ नुसती किनाऱ्यावर बसून तळमळीने न पाहता त्या गझलांचा गोडवा आणि शीतलतेचा सुखद अनुभव घेणे सुखदायी आहे.

'गोडवा हासण्याला अनोखा तुझ्या
प्राण माझे कसे हादरू लागले '

‘किनारा‘ या गझलसंग्रहास गझलनवास भीमराव पांचाळे यांनी  किनाऱ्यावरून...अशा मोजक्या शीर्षकाखाली समर्पक अशी पाठराखण केली आहे. तर मनोवेधक मुखपृष्ठ विष्णू थोरे यांनी रेखाटले आहे. समग्र प्रकाशन यांनी गझल संग्रहाचे प्रकाशन केले आहे.

          गझलकार संदीप वाकोडे यांनी  निसंग, निर्मळ प्रवाह किनाऱ्यावरून पाहताना मनात चाललेला खळखळ नाद आश्वासकपणे उलगडलेला आहे. प्रेम, विरह, दुःख, वेदना, शोषण, राजकारण, सत्ता, पैसा, संघर्ष असे विविध पैलू संदीप वाकोडे यांनी समर्थपणे हाताळले आहेत. अतिशय साध्या शब्दांतून आशयसंपन्न मांडणी असलेला, मनात खोल रुजणारा, सामाजिक बांधिलकी जपणारा, चिंतनपर, मनाचा ठाव घेणारा, आकाशाचा वेध घेणारा, गझलेचे जमिनीत पाय रोवून भक्कमपणे उभा असणारा संदीप वाकोडे यांचा हा गझल संग्रह वाचक रसिकांना नक्कीच आवडेल यात शंका नाही.

          आशयसंपन्न काही गझलांचा उल्लेख करावयाचा झाल्यास किर्तीवंत, भिमराया, फूट, रमाई, संविधान आमचे, भाकरी, पाशवी, सत्ते, अधिवेशन, बुद्ध पाहिजे, किनारा यांचा उल्लेख करावाच लागेल. अनेक वेळा वाचल्या तरीही पुन्हा पुन्हा वाचाव्या वाटतात. एकंदरीतच ‘किनारा‘  हा गझलसंग्रह वाचनीय असून आपल्या संग्रही ठेवावा असा आहे.
.................................
सतीश कोंडू खरात,
वाशिम
९४०४३७५८६९
.
गझलसंग्रहाचे नाव : किनारा
कवी : संदीप  वाकोडे
प्रकाशक : समग्र प्रकाशन, पुणे.

No comments:

Post a Comment