दोन गझला : जयराम मोरे

 



१.

सोयीनुसार माप बदलतो
स्वार्थासाठी छाप बदलतो

ईडी,खोके,धाक,दपटशा
भल्याभल्यांचा बाप बदलतो

कोण कितीही रुस्तम असु दे
संकट येता जाप बदलतो

अश्वारोही करामती जर
गधड्याचाही टाप बदलतो

निष्ठा,आदर सारे खोटे
मतलब बघून झाप बदलतो

२.

वाचलेल्या पुस्तकांचे काय झाले सांग ना?
घोकलेल्या प्रार्थनांचे काय झाले सांग ना?

कायदा बलदंड आहे जर बढाया मारतो
मातलेल्या दानवांचे काय झाले सांग ना?

मित्र सारे दूर गेले सावली फिरता इथे
काळजाच्या भावनांचे काय झाले सांग ना?

जात येथे बाटल्यावर पेटली बघ माणसे
पोरक्या झाल्या कुळांचे काय झाले सांग ना?

मीच आहे तारणारा या व्यवस्थेला खरा
शब्दवेधी  त्या शरांचे काय झाले सांग ना?

पेरणारा पेरतो  जर धर्मद्वेषी भावना
धर्म-समता राखण्याचे काय झाले सांग ना?

रोजचे  कवटाळतो मरणास राजा तो बळी
कर्जमाफी घोषणांचे काय झाले सांग ना?

................................
जयराम मोरे सोनगीर
7709565957

No comments:

Post a Comment