हेमंत पुणेकर. पुण्यात नोकरी करणारा सॉफ्टवेअर इंजिनियर. युवा गुजराती गझलकार. त्याने गुजरातीत पाऊणशेच्या वर गझला लिहिल्या. गुजरातीत त्याच्या गझलांना चांगली मान्यता मिळाली. गुजरातीत प्रतिष्ठित असलेला 'शयदा ' पुरस्कार त्याला मिळाला. त्याचा गुजराती गझलसंग्रह 'कागळनी नाव' मागच्या वर्षी प्रकाशित झाला. वीसेक गुजराती गझलांचा मराठीत आणि जवळपास तेवढ्याच मराठी गझलांचा गुजरातीत वृत्तबद्ध अनुवाद त्याने केला. ह्या अनुवादांच्या एका पुस्तकाचे नियोजन त्याने केले आहे. वृत्तांच्या लवचिकतेचे सहज उपयोजन असलेल्या चार-पाच मराठी गझलाही त्याने लिहिल्यात. 'गझलांच्या वृत्तातली लवचिकता' हा लेख लिहिताना हेमंतच्या गझलांचा मला उपयोग झाला.
हिंदी सिनेमातल्या नव्या-जुन्या गाण्यातली वृत्ते हा त्याच्या आवडीचा छंद. गुजराती- मराठी-हिंदी -उर्दू ह्या चारही भाषांचे उत्तम भान त्याला आहे. छंदशास्त्राचा त्याचा व्यासंग दांडगा आहे. याशिवाय सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अनाग्रही असलेला त्याचा मनमोकळा स्वभाव आणि तीक्ष्ण विनोदबुद्धी. त्यामुळे अभ्यासाचे आदान-प्रदान करण्यासाठी आमचे तासन्तास फोनवर बोलणे व्हायचे.
लेखनाची औपचारिक भाषा आणि सामान्य माणसांच्या तोंडी रुळलेली बोलभाषा यातील अंतर कमी करून ओघवत्या शैलीत अभिव्यक्त होण्याकरिता उर्दू- हिंदी गझलांनी गेल्या कित्येक वर्षांपासून त्यांच्या छंदशास्त्राला मान्य असलेली वृत्तातली लवचिकता अगदी सहजपणे स्वीकारली आहे. गुजरातीतही ही लवचिकता चांगल्या प्रकारे रूढ झालेली आहे. त्या लवचिकतेचे काही मोजके नियम हेमंत पुणेकरांनी खाली दिलेले आहेत. आणि त्या नियमांचा अवलंब झालेल्या तीन मराठी गझलाही दिलेल्या आहेत.
आज ना उद्या अशा प्रकारची लवचिकता स्वीकारून मराठी गझल अधिक सहज होईल.
- संपादक
.................................
सुटींचे विवरण:
[१] आ, ई, ऊ, ए किंवा ओ स्वर असलेली स्वरांत अक्षरे जर शब्दांती किंवा एकाक्षरी शब्दात येत असतील तर ती लघू म्हणून घेता येतात.
[२] एक शब्द गाल आणि गा दोन्ही वजनात घेऊ शकतो. हा शब्द बोलताना अनेकदा वापरला जात असल्याने एक गुरू एवढ्या वेळात जरी उच्चारला तरी तो ऐकणाऱ्यापर्यंत नीट पोहोचतो.
[३] 'काढतेस' किंवा 'असतेस' मध्ये 'तेस' एक गुरू म्हणून घेतला आहे.
[४] कोणाकोणाशी बोलत असतेस तू – गालगागाल गाल गागा गा. 'बोलत असतेस' या शब्दांचे वजन जरी दिसताना गागा गागा असे दिसत असले तरी बोलत् च्या त् आणि असतेस च्या अ चा संयोग होतो आणि उच्चार असा ही करता येतो= बोलतसतेस = बो[गा] ल[ल] तस्[गा] तेस[गा] = गालगागा. असा संयोग करून केलेल्या उच्चाराने गागागागा वजनाचे शब्द गालगागा वजनाचे होतात. वृत्तात त्या ठिकाणी हेच वजन अपेक्षित आहे.
[५] बाकी सगळंच बस आठवण आहे – गाल गागा ल गालगा गागा. 'बस आठवण' या शब्दांचे वजन जरी दिसताना गा गा लगा असे दिसत असले तरी बस् च्या स् आणि आठवणच्या आ चा संयोग होतो आणि उच्चार असाही करता येतो = बसाठवण = ब[ल] सा[गा] ठ[ल] वण [गा] = लगालगा. असा संयोग करून केलेल्या उच्चाराने गागालगा वजनाचे शब्द लगालगा वजनाचे होतात. वृत्तात त्या ठिकाणी हेच वजन अपेक्षित आहे.
.................................
तीन गझला : हेमंत पुणेकर
१.
देत नाही मी माझी ग्वाही कधी
मी असाहे कधी,तसाही कधी
एक तुझी आठवण सतत येते
आणि एक तू की येत नाही कधी
प्रश्न इतके मलाच का पडतात?
प्रश्न पडतो मला असाही कधी
नेहमी समजूत काढतेस माझी
घे ना समजून तू मलाही कधी
कोणाकोणाशी बोलत असतेस तू?
ऐक माझी व्यथा-कथाही कधी
२.
जेव्हा माझ्या सोबत असतो
तो असतो पण कितपत असतो
कोठे हुज्जत घालत असतो
मी सर्वांशी सहमत असतो
इकडे बुद्धी रोखत असते
तिकडून मोह खुणावत असतो
मग मी काय ठरवले असते
मी जर सारे ठरवत असतो
स्टेशन आले की तो उतरणार
कोण कुणाच्या सोबत असतो
राख जरी दिसते वरच्या वर
आत निखारा धुमसत असतो
तेच अडीच अक्षर ना जमले
रोज मी कित्ता गिरवत असतो
३.
जन्म म्हणजे हा एक क्षण आहे
बाकी सगळंच बस आठवण आहे
आत शब्दांचा लावा धगधगतोय
मौन वरवरचे आवरण आहे
वाटतंय वाट संपतेय इथे
जीवनाचे अजब वळण आहे
पडलो प्रेमात तेव्हा दिसले कुठे
पुढच्या रस्त्यास अशी चढण आहे
जन्म घालवता येतो सोबत, पण
आपले आपले मरण आहे
.................................
१.
वृत्त:- गालगा गालगाल गागागा/गाललगा
देत नाही मी[१] माझी[१] ग्वाही[१] कधी
मी असाहे कधी,तसाही कधी
एक[२] तुझी आठवण सतत येते
आणि एक[२] तू की[१] येत नाही[१] कधी
प्रश्न इतके मलाच का पडतात[३]?
प्रश्न पडतो मला असा ही[१] कधी
नेहमी[१] समजूत काढतेस[३] माझी
घेना समजून तू मलाही कधी
कोणा[१]कोणाशी[१] बोलत[४]असतेस[३] तू?
ऐक माझी व्यथा-कथा ही[१] कधी
२.
वृत्त:- गागागागा गागागागा
(मात्रावृत्त आहे चार गुरूंचे दोन आवर्तन. प्रत्येक आवर्तनात दुसऱ्या आणि चौथ्या गा ऐवजी लल घेता येते)
जेव्हा माझ्या सोबत असतो
तो असतो पण कितपत असतो
कोठे हुज्जत घालत असतो
मी सर्वांशी सहमत असतो
इकडे बुद्धी रोखत असते
तिकडून मोह खुणावत असतो
मग मी काय ठरवले असते
मी जर सारे ठरवत असतो
स्टेशन आले की तो[१] उतरणार
कोण कुणाच्या सोबत असतो
राख जरी दिसते वरच्या वर
आत निखारा धुमसत असतो
तेच अडीच अक्षर ना जमले
रोज मी[१] कित्ता गिरवत असतो
३.
वृत्त:- गालगा गालगाल गागागा/गाललगा
जन्म म्हणजे हा[१] एक क्षण आहे
बाकी[१] सगळंच बस आठवण[५] आहे
आत शब्दांचा[१] लावा[१] धगधगतोय
मौन वरवरचे आवरण आहे
वाटतंय वाट संपतेय इथे
जीवनाचे अजब वळण आहे
पडलो[१] प्रेमात तेव्हा[१] दिसले[१] कुठे?
पुढच्या[१] रस्त्यास अशी चढण आहे
जन्म घालवता[१] येतो[१] सोबत, पण
आपले आपले मरण आहे
.................................
■ कंसातील क्र. वर दिलेल्या सुटीच्या विवरणानुसार आहेत.
अतिशय सुंदर , उर्दूतील आ. सुरेश भट यांच्या गझल वाचायला मिळाल्यात त्यात घेण्यात आलेल्या सुटीं बद्दल कळले .. छान लेख
ReplyDelete