दोन गझला : प्रवीण हटकर

 



१.


घातल्या ना फुंकरी जखमास कोणी 

देत नाही प्रेरणा जगण्यास कोणी 


बांधती आपापले अंदाज सारे 

जाणिले ना माझिया हृदयास कोणी 


केवढी शोकांतिका शहरातली या

देत नाहित लाकडे सरणास कोणी 


जाणतो प्रेमास मी,हेही खरे पण 

भेटला ना अंतरी पुजण्यास कोणी 


खोदतो माझ्याच मी कबरीस आता

यायचे नाही मला पुरण्यास कोणी 


२.


तुझ्या आठवांनी भिजू लागली

गझल वेदनेने फुलू लागली ! 


कळी यौवनाची जरा बहरता

नजर वासनेने छळू लागली


उसळतात लाटा किनाऱ्यावरी

नदी काळजीने झुरू लागली


किती जीवघेणी तुझी ही अदा

तुझ्या आशिकीने कळू लागली


तसे एवढे बळ,विषाला कुठे ?

तुझ्या आठवाने मरू लागली

2 comments:

  1. व्वा. दोन्ही गझला मस्तच.

    ReplyDelete
    Replies
    1. मनःपुर्वक आभार सर

      Delete