१.
जेत्यास लोळवी ही झुंजार मद्यशाला.
करते पराभुतांचा सत्कार मद्यशाला!
देवालयात साधे चिटपाखरू दिसेना.
चोवीस तास गजबज,दरबार मद्यशाला!
बिनधास्त ग्राहका ये,जे पाहिजे विकत घे.
निर्वाण,स्वर्ग,जन्नत...बाजार मद्यशाला!
आयुष्य रुक्ष वाटे...मद्यात मोक्ष भेटे.
तू सोड श्वास घेणे...घे, यार मद्यशाला!
ना मान पाहिजे,पण अपमानही नकोना?
हृदयामध्ये खळाळो खुद्दार मद्यशाला !
२.
माझ्याच जीवनाला,माझा विटाळ आहे.
माझी कबर ध्रुवाची,मी दृढ बाळ आहे !
श्वासागणीक स्मरतो,भेटत मुळीच नाही
माझी तिची अभागी,जन्मांध नाळ आहे
फसणार खुद्द भ्रम,बघ हसलेत मौन त्यांचे
ओठी कमळ बहरलेपोटात गाळ आहे!
अश्रूत चिंब भिजकी पत्रे कशी जळाली?
अग्नीस द्या भडाग्नी मुज्जोर जाळ आहे
गाडून धर्म-जाती पत्थरदिली उगवलो...
बघ,आपल्या दिशेने,वळतोच काळ आहे!
३.
फुकाचे का मिळे राशन?
भुकेला घाबरे शासन !
म्हणाली-'मी तुझी केवळ.'
किती आनंदले 'मी पण'!
उडाला श्वास-पक्षी जर ?
जगावे चावुनी क्षण क्षण!
रणांगण रक्त मागेना ?
बरे,मौनातले भांडण !
कसा संसार सोडावा ?
तिच्या माझ्यात येतो 'पण'.
No comments:
Post a Comment