दोन गझला : सारंग पांपटवार

 



१.


बघू आपापले आपण

तळागाळातले आपण


कुठे ते हरवले नंतर

तुझ्या-माझ्यातले आपण


किती विश्वात ही विश्वे

कुण्या विश्वातले आपण


जिथे घडतेय काहीही

अशा स्वप्नातले आपण


कुणाची गरज झालो तर

कुणाचे चोचले आपण


तसे मंचावरी नसतो

जसे विंगेतले आपण


उगाचच ही सुगी नाही

उन्हाळे बघितले आपण


जराही बदल झेपेना

किती साच्यातले आपण


तुला भेटून पुटपुटलो

कुणाला गाठले आपण


कितीही लपवले आपण

तरीही दिलजले आपण


२.


फायद्याचा वाटला पण बोचलासुद्धा

हा तुझा सल्ला नकोसुद्धा हवासुद्धा


ही जगाची मूर्खता की योग्यता माझी

बसवले गेले तुझ्यासोबत मलासुद्धा


फक्त मी बोलून नाही फायदा काही

पाहिजे कोणीतरी ऐकायलासुद्धा


झेपला नाहीस तू ह्यांना बरे झाले

वा न असता गवगवा माझा जरासुद्धा


हीच तर ह्या शायराची खासियत आहे

एक निघतो अर्थ मिसऱ्याचा असासुद्धा


लावता मारायला माकडउड्या आधी

आणि नंतर दात काढुन हासतासुद्धा


पोत भाषेचाच केवळ सारखा आहे

जुळत नाही आपली शैली जरासुद्धा


सोडला नाही विषय मी मागचा मागे

वेळ आल्यावर निकाली काढलासुद्धा


बाय म्हणणारेच उरले भोवती आता

एक होता हात जो रोखायचासुद्धा


काय माहित कोणत्या रात्रींमधे रमला

दिवस तर येणार होता आपलासुद्धा



1 comment: