दोन गझला : राधा भावे

 



१.


मला माझ्यातले गाणे सुखाने वाचता येते

व्यथांची का करू पर्वा मला तर हासता येते


जपावी का कशासाठी कथा उध्वस्त रानाची

तिथेही रोप प्रेमाचे नव्याने लावता येते


कुणाचा आसरा मागू कशाला सावली शोधू?

निवार्‍याला उन्हाच्याही मला जर राहता येते !


कहाणी ऐकली आहे कुणा रेशीम विळख्याची

म्हणे चटक्यास ज्वालांच्या मखमली मानता येते


तुझा दे हात हाती अन् हवे मज चांदणे थोडे

नशा चढते मला माझी मला फेसाळता येते


दिलेली लाट स्पर्शाची कुणा बेभान दर्याने

खुबीने टाळता येते; हवी तर माळता येते.


निखारे आठवांचे अन् तुझी नाठाळशी स्वप्ने

मला बस एवढे लेणे तुझ्याशी मागता येते.


‘असे सर्वस्व माझे तू’ मला सांगायचे होते;

मनी दाटून येते ते कुठे उच्चारता येते?


२.


कातरवेळी आठवणारे असते कोणी

कोसळताना सावरणारे असते कोणी


सुखदुःखाच्या कडिपाटावर झुलता झुलता

तृप्तीचे स्वर आळवणारे असते कोणी


हव्यासाच्या लाटेवरती आरुढ सारे

स्वप्नावरती भागवणारे असते कोणी


उत्कटतेच्या बेहोषीने भोवळताना

वादळणारे आदळणारे असते कोणी


हृदयामधल्या अंधुक वाटा  शोधत जोडत

कायम मनभर वावरणारे असते कोणी


No comments:

Post a Comment