१.
टिकली बघायला, ना काजळ बघायला
आलो तुझ्या मनाचा मी तळ बघायला
डबक्यामधे नदीची तळमळ बघायला
आलेत सर्व वारे हे स्थळ बघायला
माणूस वाचणेही आहे खरी कला
डोळे कुठे मिळाले केवळ बघायला
तुळशी घरातली ती,लक्ष्मी घरातली
जाऊ नका मुलीचा मंगळ बघायला
आधी वसंत आला पानाफुलांसकट
तेव्हा कुठे मिळाले हे फळ बघायला
आधी खऱ्यास खोटे करण्यास सांगुनी
येतात मग मनाचा गोंधळ बघायला
मरताक्षणीच माझे दानात द्या नयन
अंधारल्या जिवाला द्या बळ,बघायला
ज्यांनी मला न केले आयुष्यभर जवळ
येतील प्रेत माझे केवळ बघायला
मार्गात ठिकठिकाणी दिसणार बाभळी
तुमच्यात बुद्ध ठेवा पिंपळ बघायला
एजाज़ हा जगाच्या नजरेत चांगला
पण आरशात दिसतो ओंगळ बघायला
२.
शत्रूच्या मनामधेही माझ्यासाठी घर आहे
मी मेल्यानंतर सुद्धा त्याच्याच जिभेवर आहे
हे वाद मिटविण्यासाठी प्रेमाची साखर आहे
याचाही आदर आहे, त्याचाही आदर आहे
दप्तराऐवजी आला हातात कासरा कारण
नुकताच बापही गेला अन् माय गरोदर आहे
मी परिस्थितीने दिसतो वाहत्या नदीचे डबके
बुडल्यावर कळेल त्यांना मी एक सरोवर आहे
दोघात आपल्या देवा, इतकेही अंतर नाही
जितके हे मंदिर-मस्जिदचे इथले अंतर आहे
यासाठी सुद्धा माझे सगळ्यांशी जुळते नाते
मी कधीच म्हटले नाही, ''माझेच बरोबर आहे ! ''
बाबा बाबा थांबा, ना...गळफास नका ना घेऊ
हे जगणे सुंदर आहे हे जगणे सुंदर आहे
मी फूल बनाया जातो अन् झाड गझलचे होतो
म्हणजे माझ्या पाठीशी आईसम ईश्वर आहे
३.
ही हवा की वाहवा नाही कळत
मी दिवा की काजवा नाही कळत
ज्या घराने सूर्य फासावर दिला
त्या घराला चांदवा नाही कळत
मी शहर आहे जणू शहरातले
गाव आणिक गारवा नाही कळत
ज्या शिकाऱ्याची उपाशी लेकरे
त्यास पक्षी की थवा नाही कळत
धीट झालेल्या मनाला शेवटी
ओरडा की रागवा नाही कळत
एवढा चंचल कसा झालोय मी
तू हवी की गोडवा नाही कळत
वर्ष आताचे नवे असले तरी
मी जुना की मी नवा नाही कळत
फक्त देणे तेवढे कळते मला
भीक किंवा जोगवा नाही कळत
.................................
एजाज़ शेख
अकोला
9665203106
तिन्ही ही तितक्यात ताकदीच्या आणि अमाप सुंदर आहेत 🔥
ReplyDeleteवाह, अप्रतिम 👏
ReplyDelete