१.
गीत आयुष्या तुझे मी गात आहे
बघ जरी मृत्यू उभा दारात आहे
हाल जनतेचे कसे दिसणार त्यांना
देश ज्यांनी मोजला पैशात आहे
राखणीला ठेविले देवा तुला मी
घाम माझा पेरला शेतात आहे
मोल ममतेचे तिच्या लावू नका हो
पोसले वादळ जिने गर्भात आहे
लागला नाही सुगावा या जगाला
देव जाणे काय ते दोघात आहे
रूप ज्याचे भावले डोळयास माझ्या
नाव त्याचे गोंदले हृदयात आहे
शोध घेऊ या चला त्या माणसाचा
आग ज्याने लावली विश्वात आहे
काय झाले जर निघूनी वेळ गेली
सर्व काही तर तुझ्या हातात आहे
मी तरी ठेवू कशाला मोह सांगा
राहिले रे काय या देहात आहे
२.
फुलांची बाग झाले मन, तुला भेटून आल्यावर
बरसला केवढा श्रावण, तुला भेटून आल्यावर
तुझ्या डोळ्यात जे दिसले तसे दिसले कुठे नाही
मनाने बांधले तोरण, तुला भेटून आल्यावर
कुणा सांगू कुणा नाही तुझे माझे तराणे हे
जगाशी तोडले बंधन, तुला भेटून आल्यावर
कशी सलगी करू वेड्या नभाच्या चंद्र-ताऱ्यांशी
मला हसरे दिसे अंगण, तुला भेटून आल्यावर
दिली होती निशाणी तू जरी प्रेमात ओठांना
तरी का लाजते पैंजण, तुला भेटून आल्यावर
जगाने ठेवली आहे नजर दोघांवरी आता
कसे सांगू नवे कारण, तुला भेटून आल्यावर
कशाला पाप-पुण्याची कथा सांगू जगाला मी
अरे,झाले कुणी चंदन, तुला भेटून आल्यावर
३.
नकोशी वाटते आहे तुझी वारी विठूराया
कशाला सांग येऊ मी तुझ्या दारी विठूराया
अरे उपकार माझ्यावर, जगाचे केवढे झाले
कशी फेडायची त्यांची उसनवारी विठूराया
मला तर पाहिजे आहे पुरे आकाश ध्येयाचे
जरा उजळून दे माझ्या दिशा चारी विठूराया
कुणाला वाटते वेडी, कुणा वाटे दिवाणी मी
समज बघ ना जगाची या किती भारी विठूराया
कुठे चुकले, किती चुकले, कुणा ना सांगता आले
मनावर चालली आहे सदा आरी विठूराया
No comments:
Post a Comment