तीन गझला : विशाल ब्रह्मानंद राजगुरु

 


१.


काळजी पाहिजे तर कमी दाखवा

फक्त इतके करा की खरी दाखवा


रोज पाहू तरी चंद्र-तारे किती

जी हवी ती मला चांदणी दाखवा


कीव आलीच जर का, तुम्हाला कधी 

दाखवा वाट पण ती नवी दाखवा


दाखवू सर्व शकता तुम्ही, तर मला

मी तिला मारलेली मिठी दाखवा


सिद्ध करण्यास हळव्या मनाचा मला 

आसवे ढाळलेली उशी दाखवा


एवढ्यातच समाधान मानू कसा?

आणखी दाखवा, आणखी दाखवा


२.


दुखणाऱ्या गोष्टींची केव्हा चर्चा झाली नाही

फुले घेतली,काट्यांसाठी जागा झाली नाही


व्यथा वेदना माझ्यासाठी फक्त निमित्ते नव्हती

म्हणून माझ्या आयुष्याची गाथा झाली नाही


मला स्थान मिळणारच नव्हते त्यांच्यामध्ये कारण

त्यांची दुनिया कधीच माझी दुनिया झाली नाही


कसा म्हणू मी कवी स्वतःला?

जरी म्हणाले सारे,

मला पाहिजे तशी आजवर कविता झाली नाही


भेट आपली झाली नव्हती कधी आजवर कारण

तुमची सोडा माझी सुद्धा इच्छा झाली नाही


फक्त चेहरा बघून माझा मला समजण्या इतकी

अजूनही माझ्या मौनाची भाषा झाली नाही


समजू मी उःशाप कसा त्या भीतीला? समजेना 

जर ती भीती माझा पुढचा रस्ता झाली नाही


दुःखाचा अन्याय एवढा होउनही माझ्यावर

अजून दुःखाला दुःखाची शिक्षा झाली नाही


अजून माझा आंधळेपणा सिद्ध व्हायचा आहे

अजून माझ्या विश्वासाची हत्या झाली नाही


मला चांगला म्हणणाऱ्यांना सांगू इच्छित आहे

अजून माझी पवित्र तितकी वाचा झाली नाही


३.

 

कुण्या दिशेला हवा वाहते कुठे वाहतो आपण

संभ्रमात ह्या, कुठून आलो ? हेच विसरतो आपण


माहित नसते कुण्या पिढीला मिळेल नक्की छाया

तरी जन्मभर इथे स्वतःला झाड बनवतो आपण


काळानुसार बदलत जाते अशी भूमिका अपुली 

पडद्याचा मागून शेवटी मंच सजवतो आपण


आधाराची गरज आपल्या आहे हे कळल्यावर

अंगा-खांद्यावरती अवघी पिढी फुलवतो आपण


बीज व्हायचा विचार काही इतका वाइट नाही

रुजत जेवढे जातो तितके उंच उगवतो आपण


अस्तित्वाला दोष देउनी काय फायदा नाही

दिवसाही जर अंधाराला मिठी मारतो आपण


नीज मोडुनी रात्र रात्रभर काय शोधतो इतके?

कुठल्या स्वप्नासाठी इतकी कूस बदलतो आपण?


कुणी आवडीचे आल्यावर सावलीमधे अपुल्या

डोक्यावरती आनंदाने ऊन मिरवतो आपण


No comments:

Post a Comment