१.
असे आतून केले मी मनाचे बंद दरवाजे
कशाला ठोठवू आता तयाचे बंद दरवाजे
कुण्या खिडकीतुनी गेली निघूनी सांग ना प्रिये
दहा केलेच होते मी तनाचे बंद दरवाजे
असे हे युद्ध धर्माचे, इथे माणूस गवसेना
कसा व्हावा सलोखा हा, तहाचे बंद दरवाजे
सदेही स्वर्ग गाठोनी तुका का परतला नाही
असा हा प्रश्न केला मी ? मठाचे बंद दरवाजे !
कधी तो भांडला होता,तुझे ते दार उघडाया
अता लावून घे अपुल्या युगाचे बंद दरवाजे
जगाला तारण्या बुद्धा, ‘किसा’ वेडीपिशी झाली
कुणाला मोहरी मागे,जगाचे बंद दरवाजे
तसा तो पिंजरा भारी, विखारी वर्ण,जातीचा
उभा तोडून आलो मी, गजाचे बंद दरवाजे
तयाला ऐकवू कैसी, गझल तू सांग ना ‘संजू’
घरी ते पाखरू कैदी, घराचे बंद दरवाजे
२.
काळीज काळजीने,करपून घे जरा तू
ही कूस जीवनाची, बदलून घे जरा तू
झाला इथे असा हा, काळोख जीवघेणा
आकाश पापण्यांचे,उचलून घे जरा तू
आहे जरी फुलांचा, सहवास रोज तुजला
काट्यांतल्या सलांना, समजून घे जरा तू
येतील आसऱ्याला,ती पाखरे उपाशी
ही नीळ आसमंती उधळून घे जरा तू
जखमा अजून ओल्या, आहेत अंतरीच्या
ते घाव आठवांचे,उसवून घे जरा तू
रे वार सोसण्याचा,झाला सराव मजला
हातातल्या सुऱ्याला, परजून घे जरा तू
ही आगळी दिसावी माझीच अंत्ययात्रा
हे संविधान हृदयी सजवून घे जरा तू
झाला असेल ‘संजय’, काळाच काजळीने।
उगळू नको तयाला, शिलगून घे जरा तू
...............................
प्रा. संजय घरडे
अमरावती
8605531287
No comments:
Post a Comment