१.
नित्य झाडासारखे वठतेय जीवन
जीर्ण फांदीवर कसे उरतेय जीवन
झगमगाटाने जरा दिपलो म्हणूनी
दाट अंधारात हे फसतेय जीवन?
क्षण सुखाचे संगतीला थोडके अन्
रोज एकांतात हे हसतेय जीवन
आठवांना शेष नसते रात्र कुठली
मग पहाटे सर्वही हरतेय जीवन
खाचखळगे रोज तुडवत चालतांना
एक अनुभव चांगला भरतेय जीवन
२.
लग्नात पंगतीला त्यांची स्व-जात होती
लाचार भूक परकी टकमक पहात होती
अंधार दूर करता झाला दिवा महूचा
त्यातील तू रमाई झालीस वात होती
दातात मांजरीच्या मी पाहिले पिलांना
आई तुझ्या शिव्यांची असलीच बात होती
चर्येवरून त्याच्या तो संत वाटलेला
ज्याच्यात वासनेची गंगा वहात होती
आग्रह करून आम्हा ताटात देत होती
अर्ध्य्याच भाकरीवर आई रहात होती
३.
सन्मान मागतो मी ना मान मागतो मी
कवितेस आज माझ्या या कान मागतो मी
समृद्ध मार्ग तुमचा येथे हवा कुणाला
समृद्ध अन् सुखाचे हे रान मागतो मी
कर एक सारखे जग, का रंक-राव खेळी
साधेसुधे विधात्या फर्मान मागतो मी
धमनीत खेळते जे ते रक्त भारताचे
रक्तातला अखंडित अभिमान मागतो मी
मी हारलो कसा ते काहीच ज्ञात नाही
गाफिलपणात माझ्या अवधान मागतो मी
................................
प्रभाकर पवार
कल्याण
93217 73163
जबरदस्त👌👌💐💐❤️❤️
ReplyDelete