१.
कुणाच्या फालतू वादात मी नाही
तसाही फारसा माझ्यात मी नाही!
पसारा एक जन्माचा पुरे झाला
पुनर्जन्मा तुझ्या फंदात मी नाही!
मला माझीच दुनिया व्यापुनी उरते
कुणाच्या खाजगी विश्वात मी नाही!
व्यथा आतूर झालेली छळायाला
व्यथेच्या नेमक्या टप्प्यात मी नाही !
उभे आयुष्य विस्कटते जयापायी
मनाच्या एवढ्या गुंत्यात मी नाही!
मजेने जिंदगी उधळीत मी जगतो
जिवाला घोर असणाऱ्यात मी नाही!
मला आयुष्य म्हणजे काय हे कळते
सुखाच्या फक्त आभासात मी नाही!
मनाच्या खोल गाभाऱ्यात मी असतो
दुज्या कुठल्याच आकाशात मी नाही!
मला सत्यातली दुनियाच आवडते
बदलत्या बेगडी जगतात मी नाही!
२.
जीवनाने स्पष्ट केले एकदाचे
मोल कष्टाविन कधी कळते सुखाचे?
जाळण्यासाठी हवे इंधन कशाला?
द्वेष,इर्षा हेच शत्रू माणसाचे!
ठेवतो जेव्हा अपेक्षा फार आपण
दुःखही मिळते तयांच्या भंगण्याचे
मी कुठे अभ्यास करतो जीवनाचा
पाठ गिरवत रोज असतो संचिताचे
का धरावा हट्ट कोणी जाणण्याचा
भाग्य कळले का कुणालाही स्वतःचे?
वाटते आता भिती मजला सुखाची
दुःख इतके खोल होते जीवनाचे
का उगा ठेवू अपेक्षा जीवना मी?
होत नाही या जगी कोणी कुणाचे!
मी कुणाच्या आसवांचा थेंब व्हावे
भाग्य नव्हते थोर इतके ह्या जिवाचे
फाटले आभाळ जेव्हा संपला तो
स्वप्न होते भंगले त्याचे उद्याचे
३.
प्रत्येकाची धडपड असते जगण्यासाठी
जीवन मोठे युद्धच ठरते जगण्यासाठी
दुःखांनी जर्जर झालेल्या त्या आत्म्यांना
आपुलकीची फुंकर पुरते जगण्यासाठी
जेव्हा जेव्हा पोटासाठी वणवण होते
संघर्षाची किंमत कळते जगण्यासाठी
आत्म्याला तर मुक्ती मिळते मेल्यानंतर
इच्छांची आसक्ती छळते जगण्यासाठी
खचलेल्यांना हिंमत देतो जेव्हा आपण
आशा,ऊर्जा त्यांना मिळते जगण्यासाठी
मायेची पाखर गरजेची असते जाणा
सृष्टीसुद्धा नभ पांघरते जगण्यासाठी!
कर्मगतीचा फेरा काही चुकला नाही
आसक्ती कोणाला सुटते जगण्यासाठी?
हसण्यासाठी सच्चे कारण दुर्मिळ झाले
कृत्रिम हसणे जग आचरते जगण्यासाठी!
क्षण कुठला मृत्यूचा हे माहित नसल्याने
अभिलाषा हृदयी अंकुरते जगण्यासाठी
...............................
रवीन्द्र सोनवणे,
पनवेल , नवी मुंबई
9096873678
Ek se badhkar ek gazal
ReplyDelete