१.
मलाही आवडत नाही कुण्या ताफ्यात असणे मी
मला इतकेच आवडते सदा माझ्यात असणे मी
कुणाला बोलणे नाही कुणाचे ऐकणे नाही
जगाला होउनी परकी दरी खोऱ्यात असणे मी
निळ्या त्या शुभ्र आकाशी नदीचे बोलणे ऐकत
खुले केसास सोडोनी उभी तोऱ्यात असणे मी
सुरील्या मैफलीमध्ये लिली चाफा नि झेंडूच्या
सुगंधी दाद देण्याला उभी वाफ्यात असणे मी
कुणा ना सारखे आधी कधी जगले न जगते मी
मला पटलेच नाही की कुण्या वाट्यात असणे मी
किती जाते सुखावुन हे मनाला नेहमी माझ्या
मला सोडून गेल्यावर पुन्हा त्याच्यात मी असणे
२.
असा हा एक दिवसाचा उगा सत्कार बाईचा
नव्याने वर्षभर चालू पुन्हा उद्धार बाईचा
कितीदा मांडली येथे व्यथा कित्येक लोकांनी
कधी का दूर केला पण कुणी अंधार बाईचा
शुळावर चालते आहे तरीही हासते वेडी
असा आजन्म हा चालू खुळा संसार बाईचा
घरी आई,बहिण,लेकी सुखाने नांदती त्याच्या
तरी चुरगाळतो पायी गडी श्रृंगार बाईचा
जिथे जन्मास तू अन् मी जिच्यामुळे इथे आलो
तिथे का शक्य आहे हो तुम्हा संहार बाईचा
No comments:
Post a Comment