१.
बांधून हे निखारे पदरात घेतले मी
अपराध लाख त्यांचे उदरात घेतले मी
नजरेतले विखारी दिसती कटाक्ष त्यांच्या
प्रेमातल्या विषाला सदनात घेतले मी
छळती मला अवेळी डोळे तुझे शराबी
अन् ओष्ठही गुलाबी अधरात घेतले मी
मोहात गुंतवावे जमते तुलाच का मग?
सुटका कशी करावी लक्षात घेतले मी
शब्दास आपल्या तू नसतो कधीच पक्का
लटके तुझे बहाणे सत्यात घेतले मी
२.
पेरले मी जोंधळे रानात माझ्याही
पावसाचा थेंब ना गावात माझ्याही
रान माझे बाभळींनी व्यापले आहे
नेहमीची भांडणे भावांत माझ्याही
सात-बाराचा उतारा गाळतो अश्रू
शेतसारा येत का हिश्श्यात माझ्याही
कर्ज फेडावे कसे मी भाव पडल्यावर
सावकारी पाश हे नशिबात माझ्याही
बैल नसता रान पडते पडिक आताशा
दावणीला गाय ना गोठ्यात माझ्याही
.................................
प्रकाश रामचंद्र क्षीरसागर (९०११०८२२९९)
No comments:
Post a Comment