१.
पानगळीचे दु:ख कशाला रुजणे बाकी आहे
ऋतूपरत्वे कळ्याफुलांचे फुलणे बाकी आहे
भलेबुरे जे घडून गेले कशाला दु:ख त्याचे
सुख स्वप्नांच्या धुंद क्षणांचे सजणे बाकी आहे
जुन्या स्मृतींना आठवताना मोहरते मन माझे
सुखदु:खाच्या हिंदोळ्यावर झुलणे बाकी आहे
लयास गेली मूल्ये सारी पाश्चात्यांची लागण
मराठमोळी संस्कृती अजुन जपणे बाकी आहे
खाक जाहलो जळून पुरता उरले काही नाही
धगधगणारा अग्नी अजून विझणे बाकी आहे
इतिहासाची लखलखणारी आठवताना पाने
स्वातंत्र्याची सुवर्णगाथा लिहिणे बाकी आहे.
२.
मतदानाने क्रांती व्हावी विचार बाकी आहे
खेडोपाडी साक्षरतेचा प्रचार बाकी आहे
अंधपणाने कळस गाठला,
तंत्र -मंत्राचि बाधा
अजूनसुद्धा विज्ञानाचा प्रसार बाकी आहे
झाले गेले विसरू सगळे नकोच भांडण-तंटा
अजुन तुझ्याशी नांदायाचा करार बाकी आहे
यशाचे शिखर गाठत गेले लक्ष ठेवून पुढचे आयुष्याच्या वळणावरचा थरार बाकी आहे
जातीवरुनी दंगल घडवी राजकारणी नेते
मुत्सद्दी या माणसातला विकार बाकी आहे
३.
पेटुन उठते नारी जेव्हा खळबळ होते
बिगुल वाजतो बंडाचा मग चळवळ होते
चंदनापरी झिजते काया क्षणाक्षणाला
कर्तृत्वाला सुगंध येता दरवळ होते
इतिहासाच्या पानावरच्या रणसाम्राज्ञी आठवताना रक्तामध्ये सळसळ होते
लांघलाच जर चुकुन उंबरा कधी घराचा
कळी कोवळी खुडली जाता
हळहळ होते
कलयुगातल्या सावित्रीच्या लेकी आम्ही
हुंड्यासाठी लेक जाळता कळवळ होते
तुही कुणाची लेक आहेस विसरतेस का?
घरात का मग सासुसासरे अडगळ होते
नकोच खुडणे कोवळ्या कळ्या उमलू द्याना
वंश वाढता घरदाराची हिरवळ होते
............................................
पल्लवी घनश्याम उमरे
मुंबई ( मालाड ईस्ट) ९७६६०७६४२४
No comments:
Post a Comment