१.
दाबलेल्या भावना बाहेर येऊ दे
कोंडलेल्या स्पंदनांना श्वास घेऊ दे
चांदरातीच्या कथा पडल्या जरी मागे
स्वप्न एखादे तुझे डोळ्यात ठेवू दे
माणसाला सांग त्या कर्तव्य त्याचे तू
तू तयाला दोन आधी घास जेवू दे.
काम चालू दे तुझे तू शांत चित्ताने
द्यायचे जे नाव ते लोकांस देऊ दे
वेदनेचे गाव आहे हे तुझे जगणे
एक त्याची वेदना तू आज लेऊ दे
२.
अती घाई सुखाचा नाश करते,तो असा काही
जशी ती वाळवी बघ संपवीते मालमत्ताही
पिढी ही आजची भौतिक किती आहे बघावे तू.
जराशा फायद्यासाठी विसरती पार रक्ताही.
कलंदरपण सदा कामात आले हेच जगताना.
जरा झाले बिलंदर दूर, अन् सरलाच मक्ताही.
तुझे आहे खरे जर भीड सोडूनी भिडावे तू
तुझ्या जोरापुढे हारेल ती नाठाळ सत्ताही.
निघावे आपल्या उचलून सामानास आता तू
पहा तो हा निघाला सोबतीचा आज जत्थाही.
................................
अनिल अघम
जिजाऊ नगर,अमरावती.
No comments:
Post a Comment