तीन गझला : विनोद बागडे

 


१.


एवढी खास आहे गझल

आतला श्वास आहे गझल


चातकाला जशी लागते

ही तशी प्यास आहे गझल


आज छोटी म्हणू मी कशी

मोजता व्यास आहे गझल


बारकावे तिचे शोधता

एक अभ्यास आहे गझल


सर्व रचनेतली वाटते

एकटी बॉस आहे गझल


दूर फिरतो कशाला विन्या

जर जवळपास आहे गझल


२.


लिहावे असे की मनाला भिडावे

गझल,गीत होऊन ते गुणगुणावे


फुलांच्या सुगंधात रममान व्हाया

स्वतः एक फुलपाखरू मी बनावे


मला आवडे पाखरासारखे जग

नभी मोकळ्याने खुशीने उडावे


जगाच्या प्रवासात चर्चा यशाची

कधी अपयशाला भले पण म्हणावे


नको ही स्तुती अन् नको आज निंदा

खऱ्यावर सदोदित कवन मी रचावे


किती चांगला आज माणूस गेला

असेही म्हणत लोक ते हळहळावे


म्हणे शब्द पाषाण आहेत माझे

तरी त्यातुनी प्रेम का पाझरावे?


३.


जसे भांडे तसा येतो इथे आकार पाण्याला

कधी गर्वातला नाही जडत आजार पाण्याला


उन्हाची वाफ ते होते हिवाळी बर्फ तो बनतो

बदलते रूप पाण्याचे जसा शेजार पाण्याला


निसर्गाचे खुले पाणी अता हे बाटलीमध्ये

विकू ते लागले आता चढा बाजार पाण्याला


गुणाचे केवढे पाणी दुभंगत हे कधी नाही

जरी मी मारली काठी,जरी तलवार पाण्याला


तळे चवदार, ते पाणी शितल अन् शांत हीहोते 

भिमाने लावली ऐसी इथे अंगार पाण्याला


भविष्यातील चिंता हा विषय पाणी-लढाईचा

अडव प्रत्येक थेंबाला जपावे फार पाण्याला

.................................

विनोद बागडे, वरूड

No comments:

Post a Comment