१.
वाचा पुन्हा नकाशा,पण गावठाण शोधा
कोणीतरी मनाचे अंतिम ठिकाण शोधा
सारे मिळून आधी बुडत्यास हात द्या ना
नंतर खुशाल त्याचे गीता,कुराण शोधा
इच्छासमुद्र जर का होता प्रशांत सारा
आले कसे व्यथांना मग हे उधाण शोधा
नुसतेच नाव वाचा 'आई' नव्या घरावर
वृद्धाश्रमात नंतर नामोनिशाण शोधा
आहे तसेच ठेवा पाठीत बाण माझ्या
पण धूर्त काळजाचे आधी मचाण शोधा
सरणात या चितेला जाळा भले तुम्ही पण
येताच ती स्मशानी प्रेतात प्राण शोधा
तेलाविना जगाची गाडी उभी कडेला
कोणी इराक शोधा कोणी इराण शोधा
२.
केले जलाशयाने बकरा तिला बळीचा
विश्वासघात झाला पाण्यात मासळीचा
ओतून तेल त्यावर नाही तवंग आला
पाण्यासही असावा आजार भेसळीचा
नजरा हपापलेल्या तर टाळता न आल्या
मग टाळला तिने तो रस्ताच वर्दळीचा
वृंदावनात होती चर्चा खुली कळ्यांची
केला कुणी तिथेही उल्लेख बाभळीचा
नावे जमीन केली भुलवून अंगठ्याला.
पण ऐकला न कोणी टाहो करंगळीचा
ओलांडणार होता सीमा तुझी व्यवस्थे
वेशीवरीच विरला आवाज चळवळीचा
३.
शासनाला एवढी द्या तार गुरुजी
दप्तराचा पेलवेना भार गुरुजी
जन्मलो कोठे मला माहीत नाही
का तरीही मागता 'आधार' गुरुजी
लालसा नाही घराची बेघराला
माय नाही एवढी तक्रार गुरुजी
नोकरीची लागते लाखात बोली
शिक्षणाचा पाहिला बाजार गुरुजी
आज गुणवत्ता कशी वाढेल येथे
भात अन् सर्व्हेमधे बेजार गुरुजी
विश्व समतेचे इथे टिकणार नाही
विषमता जर राहिली गर्भार गुरुजी
खून सूर्याचा जसा वस्तीत झाला
काजव्यांनी बंद केले दार गुरुजी
.................................
अश्विन मोरे (जि.प.शिक्षक)
मेहकर, बुलडाणा ह. मु. सांगली
9307085550
No comments:
Post a Comment