तीन गझला : माधुरी खांडेकर

 



१.


दिलेस इतके झोळित माझ्या मावत नाही

हाव तरीही देवा माझी संपत नाही


डायरीतली पाने सारी पिवळी पडली

आठवणींची हिरवळ काही वाळत नाही


चुना,सुपारी,काथ घालुनी विडा बनवला 

प्रेमाने तू भरवल्याविना रंगत नाही


तुझ्या अंगणी आनंदाचे झाड लावले

मला कधीही एक फूल का गावत नाही


मी इवल्याशा डोळ्यांनी नभ कवेत घेते

कुशीत माझ्या कधी चांदणी झोपत नाही


२.

 

आई काही जगली नाही

नाळ तरीही तुटली नाही


डोळ्यांनी मी बघते सारे

नजर चोरटी कळली नाही


सोबत आहे अनेक वर्षे

प्रीती काही जडली नाही


अनंत हस्ते दिलेस देवा

ओंजळ काही भरली नाही


चिता पेटली इकडे माझी

चिंता का पण मिटली नाही


३.


वापरते की काय तुला मी

बिघडवते की काय तुला मी


पोकळ धमक्या नकोस देऊ 

घाबरते की काय तुला मी


चंद्राची तू दिलीस उपमा

आवडते की काय तुला मी


घेतलास ना दावा मागे

ओरडते की काय तुला मी


दारापाशी वादळ आले

बोलवते की काय तुला मी


3 comments:

  1. सुंदर गझला, माधुरी

    ReplyDelete
  2. तिन्ही गजल सुंदर माधुरी ❤

    ReplyDelete
  3. This comment has been removed by the author.

    ReplyDelete