दोन गझला : विश्वजीत गुडधे

 



१.


अपयश, शंका, दुःख, आठवण, किती सरमिसळ! 

मरगळ म्हणजे काही मरगळ नसते निव्वळ 


हे निमित्त की पर्यायांची नदी आटली

नैतिकतेच्या झाडाला तर  सतत पानगळ


आकाशाने अंतहीनता कुरिअर करता 

दारापाशी धावत गेली चिंता अवखळ


जरा जपूनच खर्चत असतो हळहळ हल्ली 

नवीन नाही माझ्यासाठी इथला गोंधळ


नारे लावत वाचा गेली तेव्हा कळले

तुझाच रेटा, तुझीच गाणी, तुझीच चळवळ!


मात्रांसोबत टाळ्यांचाही हिशेब करतो 

पडली त्याला मुशायऱ्याची केवढी भुरळ 


२.


चंद्रतारका, फुलाबिलांचे क्लीशे टाळू

प्रेमनदीच्या पात्रामधली बदलू वाळू 


काही, काही विशेष नाही आपल्यामधे 

सांग जगाच्या डॉल्बीदेखत कसे खळाळू?


नाही पर्वा चिंध्या चिंध्या होण्याची पण 

तुझी स्तब्धता डोळ्यांमध्ये कुठवर पाळू? 


मिळेल तितक्या धारांसंगे लावू पैजा

जमेल तितक्या परंपरांचे शिक्के जाळू 


आज स्वतःच्या दुःखापायी लावू गाणी?

की दुनियेच्या मौजेखातर अश्रू ढाळू?


No comments:

Post a Comment