तीन गझला : विजयानंद जोशी

 




१.


मनासारखे जगायला वेळच नाही;

चूक बरोबर करायला वेळच नाही!


त्रास देत बसलेले हे आत कुणीसे

त्याला पण हाकलायला वेळच नाही!


दिसते कसली लगबग गडबड शेजारी

शेजारी डोकवायला वेळच नाही!


कोण बरे तिष्ठत आहे दारावरती

मला आत बोलवायला वेळच नाही!


कोण विनवण्या करते का आतून मला

धड ते ऐकून घ्यायला वेळच नाही!


कुणास ठाउक किती काळ एकत्र असू...

मिळतो क्षण जोजवायला वेळच नाही!


२.


प्रश्न साधे कधिच नव्हते हे खरे

दे तुला जमतील तसली उत्तरे


कळत नाही नेमका आहे कसा

लावतो तो चेहर्‍यावर चेहरे


करुन घ्यावी मी कशी सुटका अता

पाठिमागे जर तुझे हे भिरभिरे 


एक वाडा गावचा अजुनी उभा

ढासळुन गेलेत त्याचे पण चिरे


राहिलो आहे जरी सगळीकडे

सोडुनी देऊ कशी इथली घरे


दोन चित्रे काढली आहेस का

ठरव आता हे बरे की ते बरे


३.


अजून दिसतो विश्वास तुझा माझ्यावर;

म्हणून आहे अजून पुरता भानावर!


भिती वाटली खोल खोल त्या पाण्याची...

कुणी मला ओढून आणले काठावर?


कसली हाळी घुमते साऱ्या जंगलभर?

कोण सारखे येते तिथल्या पाण्यावर?


निव्वळ ती बदनामीची अफवा आहे?

इतके आले सांग कसे मग कानावर?


फक्त म्हणालो,'अजून आवडतेस मला' 

कशी आजही चढली लाली गालावर!


होणार कधी नाही दुनिया निःसुगंध 

पूर्ण भरोसा ठेव फुलांच्या नात्यावर!

No comments:

Post a Comment