१.
ऑन लाइन चॅट घरटी वाढले
मूक वाणीला दुरावे काचले
दुःख होते सज्ज हलके व्हायला
आसवांनी साथ देणे टाळले
वासरू चुकले दिशा,आले पुढे
पारध्याचे पोट ना हेलावले
पंख आधी छाटले त्यांनी तिचे
मग तिला देवी म्हणत ओवाळले
दाद तेजाला दिली त्यांनी तरी
का तमाचे श्रेयही नाकारले
सौख्य अन् दुःखामधे फिरते कथा
मोजके असते कथानक चांगले
शेवटी होतो हजर यम न्यायला
सत्य कोणी हे सहज स्वीकारले
२.
सृजनास अर्थ देतो मल्हार पावसाचा
चैतन्य मूर्त करतो झंकार पावसाचा
सौख्यात खूप वेळा डोळ्यातुनी बरसतो
कळण्यास क्लिष्ट असतो व्यवहार पावसाचा
आणे कधी त्सुनामी जातो कधी रजेवर
बेताल फार होतो संचार पावसाचा
पाहून वाट त्याची झरतात मूक डोळे
होतो पदोपदी मग उद्धार पावसाचा
लेवून साज हिरवा होते प्रसन्न धरती
करते फळा-फुलांनी सत्कार पावसाचा
३.
हातामधला हात कधी जर सुटला नसता
सटवाईचा मूक दरारा टिकला नसता
आठवणींच्या जाळ्यातच गुरफटला असता
काळ कोडगा बनून जर का सरला नसता
अहं स्वतःचा त्याने जर आवरला असता
प्रेमामध्ये खडा मिठाचा पडला नसता
लेप सुखाचा चढवण्यास ती राजी होती
पण नजरेला तिचा इरादा पटला नसता
स्वप्नांचा वध जर का त्याने केला नसता
उपास त्याच्या पोटाला परवडला नसता
उंबरठ्यावर अधू नजर जर खिळली नसती
तर घरट्याचा ध्यास पिलांना उरला नसता
देशहिताच्या बाजूला जर झुकला असता
भ्रष्टाचाराला तो नेता रुचला नसता
No comments:
Post a Comment