तीन गझला : डॉ.मंदार खरे

 




१.


आवडू ती लागलेली पाहताच तेव्हा

वय असावे फक्त माझे चार-पाच तेव्हा


केवढी मोठी दरी ही आपल्यात झाली 

वाटलेली फार छोटी एक खाच तेव्हा


शोध नाते हरवलेले डायरीत माझ्या

पाहिजे तेथे उलट पण पूर्ण वाच तेव्हा


घोळक्यामध्ये सुखाच्या मी असेन दुःखा

शोधताना कर जराशी उंच टाच तेव्हा


एक मुलगी पुसत असते कार थांबलेली

एक मुलगी करत असते बंद काच तेव्हा


२.


कोणासाठी कधी बांधली कमान नाही

कोणालाही उठसुट म्हटले महान नाही


येते, जाते, रुसते ,खुपते वा आवडते

वेळ कुणाची कधी राहिली समान नाही


हयातभर कोळून प्यायलो  दुःख ,वेदना

पाण्यावरती भागवलेली तहान नाही


मिळवू शकलो मीही असतो सहानुभूती

फक्त व्यथांचे कधी थाटले दुकान नाही 


विसरायाला भाग पाडले बालपणाला

सतत बोलले, ''राहिलास तू लहान नाही”


३.


हातामध्ये हात जीवना तुझ्या घालतो

पुन्हा एकदा साद नभाला नव्या घालतो


देवावरती माझी श्रद्धा  अपार आहे

दर्शनास जाताना चपला जुन्या घालतो


ओठांबाबत जेव्हा जेव्हा करार करतो

अंतर,जागा अटी त्यातल्या खुल्या घालतो


अनेक वेळा माझ्याबाबत असेच घडते

मीच आजची गळ देवाला उद्या घालतो


किती सुसंस्कृत,सोज्वळ आधी भाषा होती

आता जो तो बिप-बिप आणिक फुल्या घालतो


चढत राहिलो शिखर विचारच नाही केला

पायाखाली कोण केवढ्या दऱ्या घालतो


गावामधून शहरामध्ये जातो माणुस

तिथे मनाला वेगवेगळया कड्या घालतो


पळता पळता विस्कटल्यावर जरा थांबतो

पुन्हा हयातीला साडीगत निऱ्या घालतो


सर्वांच्या  नशिबात कुठे तो पऱ्या घालतो?

असे म्हणू की जमेल तितक्या बऱ्या घालतो


No comments:

Post a Comment