दोन गझला : ज्ञानेश पाटील

 




१.


किती होते निराळे ते,तुझ्या माझ्यात झालेले

कुणा नाही कळाले ते, तुझ्या माझ्यात झालेले


किती ठिणग्या इथे होत्या, पुरेशी इंधने होती,

तरी नाही जळाले ते, तुझ्या माझ्यात झालेले


असूदे ओल थोडीशी मनाला भूतकाळाची,

नको मोजू उन्हाळे ते, तुझ्या माझ्यात झालेले


नव्हाळी ती,जिव्हाळे ते, दिलासे ते,खुलासे ते,

उसासे ते, उमाळे ते तुझ्या माझ्यात झालेले


तुला ना आठवे काही, मलाही काळजी नाही

कुणाचेही न झाले ते,तुझ्या माझ्यात झालेले


कळेना ’खून’ होता की, असावी आत्महत्या ती

पुलाखाली मिळाले ते, तुझ्या माझ्यात झालेले



२.


भोवतालावरी घट्ट ताबा तुझा केवढा राहतो

दूर गेलो कितीही तरी शेवटी मी तुझा राहतो


आपल्याला इथे आणले ती जुनी वाट गेली कुठे?

या विचारात रस्ता पुढे चालतो, चालता राहतो


हा कसा क्रूस आहे, इथे रोज अस्थीर का वाटते?

नेमका कोणत्या भावनेचा खिळा हालता राहतो?


प्रश्न नाही असा की पुन्हा का निराशाच केलीस तू

प्रश्न आहे असा- मी तुझ्यावर विसंबून का राहतो?


काय होईल या कल्पनेने शहारून जाते नदी

एक निर्धार जेव्हा पुलाच्या कडेला उभा राहतो


वाटले सर्व काही नव्याने जरी रोजच्यासारखे,

आठवण राहते,राहतो डाग किंवा तडा राहतो

1 comment: